ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात प्रश्नोत्तराचा तास रंगणार आहे. २७ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी अमेरिकेतील फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार असून या भेटीत मोदी व झुकरबर्ग यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती खुद्द झुकरबर्गने दिली आहे.
नरेंद्र मोदी सप्टेंबर अखेरीस संयुक्त राष्ट्राच्या महासभेनिमित्त अमेरिकेत जाणार असून या दौ-यात मोदी सिलीकॉन व्हॅलीतील फेसबुकच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. झुकरबर्गने मोदींना या भेटीसाठी निमंत्रण दिले असून मोदींच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. मोदींनीही हे निमंत्रण स्वीकारत झुकरबर्गचे आभार मानले आहे. या प्रश्नोत्तराच्या तासासाठी भारतीयांनीही त्यांची प्रश्न पाठवावीत असे आवाहन मोदींनी केले आहे. २७ सप्टेंबर रोजी फेसबुक मुख्यालयाच्या टाऊन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सकाळी दहा वाजता ही चर्चा होणार आहे.