सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन पोस्ट या व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा यातील काही पोस्ट अथवा मेसेज हे फेक असतात. अशाच फेक, धोकादायक आणि हिंसक पोस्टबाबत फेसबुकने कठोर पावलं उचलली आहे. काही कारणास्तव अशा पोस्ट अनेकदा डिलीट केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देखील एक पोस्ट फेसबुकने आता डिलीट केली आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर ट्विटर आणि फेसबुक या दोघांनीही अॅक्शन घेतली आहे. फेसबुकने ट्रम्प यांची कोरोना व्हायरससंबंधीची एक पोस्ट डिलीट केल्याची माहिती मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये कोरोना व्हायरस हा फ्लू सारखाच असल्याचा दावा केल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकने ही पोस्ट हटवली असली तरी त्याआधी तब्बल 26,000 हून अधिक वेळा ती शेअर केली गेली आहे. फेसबुकच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासारख्या गंभीर आजाराबाबत चुकीची माहिती देणारी पोस्ट आम्ही हटवण्यात आली आहे. यासोबतच ट्विटरने देखील त्यांच्या एका पोस्टवर वॉर्निंग लेबल लावलं आहे. कोरोना संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असेल अथवा एखाद्या नियमांचं उल्लंघन केलं जात असेल तर ते वॉर्निंग लेबलवरून सांगितलं जातं.
सोशल मीडियानं घेतली अॅक्शन
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक झाली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2019-20 मध्ये अमेरिकेत फ्लूमुळे 22,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत याआधीही असं झालं आहे. ऑगस्टमध्ये फेसबुकने कोरोना संदर्भातील ट्रम्प यांची एक पोस्ट हटवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोस्ट हटवून सोशल मीडियाने अॅक्शन घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले...
मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच "माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका" असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प अद्यापही कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आता व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार ट्रम्प हे संध्याकाळी 6 वाजता वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधून पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. पण ट्रम्प अद्यापही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र तब्येतीत काही सुधारणांमुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.