ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - आजच्या टेक्नोसॅव्ही युगात आबालवृद्धांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं फेसबूक आज आपला १२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजचा हा दिवस ' फ्रेंड्स-डे' म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहन फेसबूकचा सह-संस्थापक मार्क झुकेरबर्गने केले आहे.
वर्धापनदिनानिमित्त फेसबुकने युझर्ससाठी एक खास व्हिडीओची भेट आणली आहे. तुम्ही फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करताच होमपेजवर तुमच्या मित्रपरिवारासोबतच्या आठवणी ताज्या करणा-या छायाचित्रांचा संग्रह असलेला ‘हॅप्पी फ्रेंड्स डे’ या नावाचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. तुमचे आत्तापर्यंतचे खास, आनंदी क्षण या व्हिडीओत पाहता येणार असून हा व्हिडीओ शेअर करण्याची सुविधाही तेथे देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच झुकेरबर्गने आजचा हा दिवस फ्रेंडस डे म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्याच्या वॉलवर केले होते. तसेच लोकांना त्यांच्या मैत्रीसंदर्भातील स्टोरीज शेअर करण्यासही सांगितले होते. समाजमाध्यमांत सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांच्या यादीत फेसबुक अव्वल स्थानावर असल्याचा आनंदही झुकरबर्गने व्यक्त केला.