नवी दिल्ली - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी फेसबुकने पुढाकार घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांना जीव गमवावा लागला असून कोरोनावर लस शोधण्यासाठी फेसबुकने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसीला चान यांच्याकडून समाजकार्यासाठी चालविण्यात येणाऱ्या चान झुकरबर्ग इनिशेटीव्हने कोरोनावर लस शोधणासाठी बिल एंड मिलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत हात मिळवला आहे.
चान झुकरबर्ग इनिशिएटीव्हने कोरोना लस शोधण्यासाठी बिल एंड मिलिंडास गेट्स फाउंडेशनसोबत हात मिळवून २.५ कोटी डॉलर एवढी रक्कम देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा सध्या आपला वेळ आणि पैसा समाजकार्यासाठी वापरत आहेत. आता फेसबुकने देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. झुकरबर्ग यांच्या पत्नी चान यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कोरोना व्हायरसच्या आपत्तीसंदर्भात चान झुकरबर्ग इनिशिएटीव्हच्या निर्णय़ाची माहिती दिली.
चान म्हणाल्या की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, कोरोना व्हायरसवर लस शोधण्याच्या प्रयत्नांना गती यावी यासाठी गेट्स फाउंडेशन आणि इतर संस्थांच्या साथीत चान झुकरबर्ग इनिशिएटीव्ही पुढाकार घेणार आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या संशोधकांना आणि संस्थांना आम्ही आर्थिक मदत करणार आहोत. जेणेकरून कोरोनावर उपाचार शोधण्याच्या प्रयत्नांना गती येईल.
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस या महामारीमुळे जगात आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोना बधितांची संख्या एक लाखांवर गेली आहे. अशा स्थितीत फेसबुक आणि मायक्रोसॉफ्टचा कोरोनावर लस शोधण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.