सॅनफ्रान्सिस्को : फेसबुक इंकच्या महसुलात पहिल्या तिमाहीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. याशिवाय कंपनीच्या युजर्सचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, वाढत्या नफ्यात त्यांचाही मोठा वाटा आहे.कंपनीने चर्चित मोबाईल अॅप आणि लाईव्ह व्हिडिओच्या सुविधेने नवीन जाहिरातदारांना जोडण्यासाठी आणि विद्यमान जाहिरातदारांना अधिक खर्च करण्यास प्रेरित केले आहे. बुधवारी जवळपास तासाभराच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्समध्ये ९.५ टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचा शेअर ११८.३९ डॉलरवर पोहोचला.चार वर्षांपूर्वी कंपनीच्या आयपीओच्या सुरुवातीच्या तुलनेत हा स्तर तीनपट जास्त आहे. फेसबुकचा महसूल ५२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ५.३८ अब्ज डॉलर म्हणजे ३५ हजार कोटी रुपये झाला. फेसबुकच्या महसुलात सर्वात मोठा वाटा जाहिरातींचा राहिला. जाहिरातीतून कंपनीच्या मोबाईल अॅडचा ८२ टक्के वाटा राहिला.आता आपण नॉन वोटिंग शेअर्सचा नवीन वर्ग तयार करणार आहोत, अशी घोषणा फेसबुकने केली आहे. त्यांना विद्यमान शेअर होल्डर्सप्रमाणेच लाभांश दिला जाणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, जगभरात १.६५ अब्ज लोक फेसबुकला जोडले गेले आहेत. हा आकडा ३१ मार्चचा आहे. गेल्या वर्षी याच काळात फेसबुकचे एकूण १.४४ अब्ज युजर्स होते. कंपनीचे वित्तीय परिणाम जाहीर करताना मुख्य कार्यकारी व सहसंस्थापक जुकेरबर्ग म्हणाले की, युजर दररोज किमान ५० मिनिटे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरमधून जातात. जाहिरातदार आता टी.व्ही.वरून जरा बाजूला होत मोबाईल आणि वेबप्लॅटफॉर्मवरही मोठी गुंतवणूक करीत आहेत. त्याचा सर्वाधिक फायदा फेसबुकला होत आहे. मात्र, कंपनीला मोबाईल व्हिडिओ मार्केटमधील प्रतिस्पर्धी कंपनीला स्नॅपचेर आणि यू ट्यूबकडून मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. स्नॅपचॅट आणि यू ट्यूबवर दररोज जवळपास एक अब्ज व्हिडिओ लोक पाहतात. फेसबुकने अलीकडेच आपल्या लाईव्ह व्हिडिओ प्रॉडक्टला प्रोत्साहन दिले होते.
फेसबुकचा नफा वाढला; युजर्सची संख्याही वाढली
By admin | Published: April 29, 2016 5:29 AM