चीनमध्ये एका निराश फॅक्टरी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचा धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येच्या अनेक घटना आपण वाचत असतो. पण ही फार भयंकर आहे. या व्यक्तीने स्टॉक मार्केटमध्ये जवळपास सहा लाख रूपये गमावले होते. त्यामुळे तो टेंशनमध्ये होता. अशात त्याने स्टीलच्या गरम भट्टीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. रिपोर्टनुसार, त्याने आत्महत्या केली त्यावेळी भट्टीचं तापमान ९०० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास होतं.
वांग नावाची ही व्यक्ती चीनच्या स्टील तयार करणाऱ्या बूगॅंग या प्रसिद्ध कंपनीत काम करत होता. तो इथे गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत होता. या कंपनीने वांगबाबत ३१ मार्चला माहिती जारी केली. त्यात सांगण्यात आले की, वांग गेल्या आठवड्यात कंपनीच्या स्टील पाइप ब्रॅंचमध्ये नाइट ड्यूटी करत होता. पण त्यानंतर तो अचानक गायब झाला.
त्यानंतर कंपनीने त्याचा शोध घेणं सुरू केलं तर सीसीटीव्ही फुटेजमधून त्याची माहिती मिळाली. कंपनीच्या फुटेजमधून समोर आले की या कंपनीच्या एका भट्टीत स्टील वितळवण्याची प्रक्रिया सुरू होती. वांगने आधी ही भट्टी पाहिली आणि त्याने त्याचं हेल्मेट व ग्लव्ज काढले. काही वेळ थांबला आणि नंतर त्याने उकळत्या स्टीलच्या भट्टीत उडी घेऊन जीव दिला.
वांगसोबत काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की, तो एक लाजाळू व्यक्ती होता आणि सिंगल होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावत होता. चीनचं मार्केट गेल्या तीन महिन्यात सर्वात खाली आलं होतं. वांगचे ६ लाख रूपये स्टॉकमध्ये बुडाले होते.
स्टील कंपनीने सांगितले की, असा अंदाज आहे की, वांग खूप जास्त पैसे गमावून बसला होता आणि आपलं वाढतं लोन फेडू शकत नव्हता. कदाचित त्यामुळेच त्याने हे भयंकर पाउल उचललं असेल. पोलिसांनी चौकशी केल्यावर ही घटना आत्महत्या असल्याचं स्पष्ट केलं.