Fake Astronaut: एका महिलेच्या फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. जपानच्या एका महिलेला एका व्यक्तीने तो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये काम करत असलेला एक अंतराळवीर असल्याचं सांगत फसवलं. या व्यक्तीने महिलेला फसवत तिच्याकडून 4.4 मिलियन येन म्हणजे 24.8 लाख रूपये लुटले.
एका रिपोर्टनुसार, या फेक अंतराळविराने पृथ्वीवर परत येऊन तुझ्यासोबत लग्न करतो असं सांगत एका 65 वर्षीय महिलेकडे पैशांची डिमांड केली. शिगा प्रांतात राहणाऱ्या महिलेची जूनमध्ये फेक अंतराळवीरासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, त्याच्या प्रोफाइलवर अंतराळातील फोटो होते. ज्यामुळे तिला वाटलं की, तो अंतराळ स्टेशनवर काम करत आहे.
रिपोर्टनुसार, दोघेही ऑनलाइट चॅटींग करत होते. दोघेही एका जपानी मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवाद साधत होते. तो व्यक्ती महिलेला म्हणाला होता की, तो तिच्यावर प्रेम करतो. इतकंच नाही तर त्याने तिला लग्नासाठीही विचारलं.
तो तिला सतत सांगत होता की, तो तिच्यावर प्रेम करतो आणि जपानमध्ये त्याला तिच्यासोबत नवीन जीवनाला सुरूवात करायची आहे. ठग तिला म्हणाला की, त्याला पृथ्वीवर परत येण्यासाठी आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी पैशांची गरज आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, त्याने दावा केला होता की, रॉकेटसाठी लॅंडींग फी द्यावी लागेल. ज्यामुळे तो जपानला येऊ शकतो.
महिला कथितपणे यासाठी तयार झाली आणि त्याला पैसे पाठवू लागली. योमीउरी शिंबुननुसार, तिने 19 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान एकूण त्याला 4.4 मिलियन येन इतके पैसे पाठवले. पण नंतर व्यक्तीकडून पैसे मागण्यात आल्यावर तिला संशय आला. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस चौकशी करत आहेत.