वॉशिंग्टन - तुम्ही जर दैनंदिन आयुष्यात सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सौंदर्य प्रसाधनांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बनावट व भेसळयुक्त सौंदर्य प्रसाधन उत्पादनांमध्ये जनावरांची विष्ठा असल्याची माहिती अमेरिकी पोलिसांना मिळाली आहे. या उत्पादनांचा भारतात 40,000 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय होतो.
सीएनएननं दिलेल्या माहितीनुसार, ज्या ब्रँड्समध्ये जनावरांची विष्ठा असल्याचे आढळून आले आहे, त्यामध्ये सुप्रसिद्ध मॉडेल काइली जेनरचा ब्रँड काइली कॉस्मेटिक्सचाही समावेश आहे. लॉस एंजेलिस पोलीस विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांची चाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणू आणि जनावरांची विष्ठा आढळल्याचा खुलासा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंटी एलीमध्ये 21 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान जवळपास 700,000 डॉलर किंमतीचे भेसळयुक्त उत्पादन जप्त करण्यात आले आहे. सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, गॅरेज तसंच बाथरुममध्ये बनवण्यात येणाऱ्या या उत्पादनांमध्ये विष्ठा मिसळली जाते.
काइलीची बहीण किम कर्दाशियन वेस्टनं या छापेमारीसंदर्भात ट्विट करत म्हटले की, ''पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या काइली लिप किट्सची करण्यात आलेल्या चाचणीमध्ये विष्ठा असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे भेसळयुक्त उत्पादन खरेदी करू नका.''