इस्लामाबाद: नक्कल करायला पण अक्कल लागते असं म्हणतात. पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या बाबतीतही तोंडावर पडले आहेत. पाकिस्तानचा विकास जगाला दाखवण्यासाठी पंतप्रधान खान यांच्याकडून काही फोटो प्रसिद्ध करण्यात आले. मात्र यातले बरेच फोटो भारतातले होते. त्यामुळे खान यांचा खोटेपणा उघड झाला. देशाचा विकास दाखवण्यासाठी खान यांनी भारतातल्या फोटोंचा आधार घेतल्यानं अनेकजण त्यांची चेष्टा करत आहेत.
आपल्या सरकारच्या काळात देशाचा किती विकास झाला आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न खान करत आहेत. सरकारची कामगिरी दाखवण्यासाठी खान यांच्या पक्षानं काही फोटो शेअर केले. मात्र हे करताना खान यांनी एक मोठी चूक केली. कारण सरकारकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोंपैकी बरेचसे फोटो भारतातले आहेत.
इम्रान खान यांच्या सरकारला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. विकास आणि प्रगती दाखवण्यासाठी पत्रकं छापण्यात आली आहेत. त्यातून सरकारची कामगिरी मांडण्यात आली आहे. मात्र पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नेत्या आणि खासदार मरियम औरंगजेब यांनी खान सरकारची पोलखोल केली. मरियन यांनी ट्विट करून खान यांच्या पक्षाची पत्रकं, बॅनरच्या फोटोंचा नेमका सोर्स सांगितला आहे. खान यांच्या पक्षानं फोटो नेमक्या कोणत्या साईटवरून घेतले, त्या वेबसाईटचा उल्लेखदेखील मरियम यांनी केला आहे.
खासदार मरियम यांनी खान यांच्या पक्षाला ट्विट करून उघडं पाडलं आहे. 'ब्रेकिंग न्यूज. इम्रान साहेबांनी तीन वर्षांतील आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय वेबसाईटवरील फोटोंचा वापर केला आहे. खान साहेबांना मसीहा म्हणून दाखवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कोट्यवधींची कल्याण योजना भारतीय पोर्टल्सकडून करण्यात आलेल्या चोरीवर आधारित आहे,' असं मरियम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.