जगभरात सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन आता वेगळ्याच कारणामुळे त्रस्त झाला आहे. लोकसंख्येत हळूहळू घट होत असल्याने चीनचं टेन्शन आता वाढलं आहे. एका नवविवाहित महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या वतीने महिलेला एक फोन आला होता ज्यामध्ये ती कधी प्रेग्नेंट होणार असा प्रश्न तिला विचारण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महिलेच्या या पोस्टवर जवळपास दहा हजार लोकांनी कमेंट केली आणि त्यांनाही अशाच प्रकारचा कॉल आल्याचं म्हटलं आहे. आणखी एका महिलेने देखील अशाच प्रकारच्या कॉलची माहिती दिली आहे. सरकारला असं वाटतं की नवविवाहित एका वर्षात प्रेग्नेंट झाले पाहिजेत असं फोनवर अधिकाऱ्याने महिलेला सांगितलं. यासाठी सातत्याने फोन करत असल्याचं देखील म्हटलं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये एका महिलेचं लग्न झालं. पण तिला त्यानंतर दोनदा प्रेग्नेंट कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आल्याचं तिने कमेंटमध्ये सांगितलं.
"तुमचं लग्न झालंय मग तुम्ही मुलांचं प्लॅनिंग का करत नाही?"
फोनवर अधिकारी तुमचं लग्न झालं आहे मग तुम्ही मुलांचं प्लॅनिंग का करत नाही? मुलांना जन्म देण्यासाठी वेळ काढा असं म्हणतात. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीत देशाचा बर्थ रेट वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आणि देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी रणनीतिमध्ये सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हळूहळू लोकसंख्या घटत असल्याचं देखील चीनने आता स्वीकारलं आहे.
वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019 नुसार, सध्या चीन 1.44 अब्ज लोकसंख्येसह पहिल्या स्थानावर आहे तर भारत 1.39 अब्जासह दुसऱ्या स्थानावर आहे. जगभरातील एकूण लोकसंख्या ही चीनच्या 19 टक्के आणि भारताच्या 18 टक्के आहे. रिपोर्टनुसार, 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या वाढून चीनपेक्षाही जास्त होईल. तसेच चीनची लोकसंख्या 2019 ते 2050 दरम्यान 3.14 कोटी म्हणजेच जवळपास 2.2 टक्क्यांनी कमी होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"