ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १२ - गुरूवारपासून सुरू होणा-या फुटबॉलच्या महासंग्रामाची सर्व क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असताना गूगल 'डूडल'लाही त्याची भुरळ पडल्यास नवल ते काय? गूगलने फूटबॉल वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर आपल्या होमपेजवर एक छानसे डूडल तयार केले आहे.
गूगलच्या होमपेजवरील या 'डूडल'वर क्लिक केल्यावर तेथे फूटबॉलसहित बॅकग्राऊंडमध्ये बदल होण्यास सुरूवात होते आणि आपल्याला ब्राझीलमधील प्रसिद्ध ठिकाणांचे दृश्य दिसू लागते. या डूडलमध्ये 'Google' ही अक्षरेही फूटबॉलप्रमाणे उड्या मारायला आणि जल्लोष करायलाही सुरूवात करतात.
साओ पाउलो येथे फुटबॉल महासंग्रामाचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून अनेक दिग्गज कलाकार यात आपली कला सादर करणार आहेत. ६० हजारांहून अधिक लोक साओ पाउलोच्या कोरिंथिएस एरिनामध्ये होणा-या या कार्यक्रमास, तसेच ब्राझील-क्रोएशिया हा शुभारंभाचा सामना पाहण्यासाठी गर्दी करतील तर जगभरातील १०० कोटींहून अधिक लोक टीव्हीद्वारे या कार्यक्रमाचा आनंद लुटतील. सोहळ्यात २५ मिनिटांचा विशेष शो ब्राझील संस्कृतीला समर्पित केला आहे.