ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 26 - प्रसिद्ध ब्रिटीश पॉप सिंगर जॉर्ज मायकल यांचे रविवारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. 1980 च्या दशकात त्यांनी वॅम म्हणून लोकप्रियता मिळवली. अँड्रयू रीडगीले आणि जॉर्ज मायकलची जोडी वॅम म्हणून प्रसिद्ध होती. त्यानंतर जॉर्ज यांनी एकाटयाने गायनाला सुरुवात केली आणि करीयरमध्ये उंची गाठली.
इंग्लंड गोरींगमधल्या रहात्या घरी जॉर्ज मायकल यांनी अखेरचा श्वास घेतला. ते आजारी नव्हते. ह्दयविकाराचे त्यांचे निधन झाले अशी माहिती जॉर्ज यांचे प्रसिद्धीप्रमुख सिंडी बर्गर यांनी दिली. मायकल यांची एक गायक म्हणून यशस्वी कारकीर्द होती तसेच ते अनेक वादातही अडकले.
वेक मी अप बीफोर यू गो-गो, यंग गन्स आणि फ्रीडम ही त्यांची गाणी प्रचंड गाजली. यशस्वी गायक असण्याबरोबर ते गीतकारही होती. समीक्षकांनीही त्यांना दाद दिली होती. 80-90च्या दशकात ते प्रचंड लोकप्रिय होते. चार दशकांच्या करीयरमध्ये जगभरात त्यांच्या 100 कोटी पेक्षा जास्त अल्बमची विक्री झाली. प्रतिष्ठेचा ग्रॅमी, अमेरिकन म्युझिक अॅवॉर्डही त्यांनी मिळवले.