लागोस : नायजेरियातील बोको हराम संघटनेने अपहरण केलेल्या शाळकरी मुलींची चित्रफीत प्रसिद्ध केली असून, या मुलींना इस्लाम धर्मात धर्मांतरित केल्याचा दावा केला आहे, तसेच जोपर्यंत अटक केलेल्या सहकार्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत या मुलींची सुटका केली जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे. संघटनेचा नेता अबुबकर शेकाऊ या १७ मिनिटांच्या चित्रफितीत बोलत असून, तो मुलींना दाखवत आहे. या मुली पूर्णपणे मुस्लिम पोशाखात असून, त्या अज्ञात स्थळी प्रार्थना करताना दिसत आहेत. १४ एप्रिल रोजी २७६ मुलींचे अपहरण करण्यात आले होते. ईशान्य नायजेरियाच्या बोर्नो राज्यातील चिबॉक गावातून या मुलींचे अपहरण झाले असून, या गावात बहुतांश लोक ख्रिश्चन आहेत. अजूनही २२३ मुली बेपत्ता असल्याचा पोलिसांचा दावा आहे. चित्रफितीत १३० मुली असून, त्यांनी राखी वा काळ्या रंगाचा हिजाब घातलेला आहे. झाडाखाली मुली बसलेल्या असून, कुराणमधील पहिली आयत म्हणत आहेत. यापैकी तीन मुलींना प्रश्न विचारले असता, दोन मुलीनी आपण ख्रिश्चन असून आपला धर्म बदललेला असल्याचे सांगितले. तर एक मुलगी मुस्लिम आहे. तीनही मुलींनी आपला मुस्लिम धर्मावर विश्वास असल्याचे सांगितले. मुलींनी आपल्याला काही इजा न केल्याचे सांगितले. ही चित्रफीत कधी घेतली हे समजलेले नाही. पण चित्रफितीचा दर्जा चांगला असून, ती कॅमेर्याने चित्रित केल्याचे दिसत आहे. (वृत्तसंस्था)
अपहृत नायजेरियन मुलींची चित्रफीत प्रसिद्ध
By admin | Published: May 13, 2014 4:49 AM