Farmers' protest in Rome : (Marathi News) फक्त भारतातच नाही तर जगभरात शेतकरी आंदोलनांचा स्वतःचा इतिहास आहे. भारतीय शेतकऱ्यांचे आंदोलन सध्या चर्चेत आहे, मात्र युरोपातील अनेक देशांमध्येही शेतकरी सरकारच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. युरोपातील जवळपास १० देशांमध्ये जानेवारीपासून शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. या देशांमध्ये फ्रान्स, पोलंड, स्पेन, जर्मनी, इटली, ग्रीस, रोमानिया, बेल्जियम, पोर्तुगाल, लिथुआनिया यांचा समावेश आहे.
गुरुवारी आंदोलक शेतकऱ्यांनी इटलीतील रोममधील प्राचीन सर्कस मॅक्सिमसवर हल्ला केला. सर्कस मॅक्सिमसभोवती शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चालवण्यास सुरुवात केली, या आंदोलनादरम्यान पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. याशिवाय, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या कार्यालयाजवळ शेतकऱ्यांचा एक गटही जमा झाला. तसेच, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या घेऊन युरोपीय संघाचे कार्यालय गाठले, तेथे त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांचे तक्रार पत्र सुपूर्द केले.
इटलीच्या राजधानीचे हे दृश्य २६ जानेवारी २०२१ रोजी भारताची राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर शेकऱ्यांनी केलेल्या आंदोलनासारखे होते. त्यावेळी आंदोलक शेतकरी आयटीओ मार्गे ट्रॅक्टरमधून दिल्लीत दाखल झाले होते. शेतकऱ्यांनी येथे ट्रॅक्टर चालवले होते. त्यानंतर शेतकरी लाल किल्ल्याकडे निघाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आंदोलनाचे असेच काहीसे चित्र रोममधील शेतकरी आंदोलनात पाहायला मिळाले.
काय करत आहेत शेतकरी आंदोलन?युरोपमध्ये वेगाने बदलणारे हवामान बदल पाहता युरोपीय संघाने कायद्यांमध्ये अनेक बदल केले आहेत. याशिवाय, युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून संपूर्ण युरोपमध्ये महागाई वाढली आहे. उत्पन्नात झालेली घट आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यांच्या तक्रारी इंधनाच्या किमतीपासून ते हवामान बदल कमी करण्यासाठी तयार केलेल्या युरोपीय संघाच्या पर्यावरणीय कायद्यांपर्यंत आहेत. सरकारच्या या सर्व धोरणांमुळे आपल्या उपजीविकेचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे?शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींपैकी एक असेलले पिनो कंव्हर्टिनी यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांकडे किमतींवर सौदेबाजी करण्याची ताकद नाही, आमच्याकडे वरून केलेल्या राजकीय निवडींवर सौदेबाजी करण्याची ताकद नाही. मग आम्ही काय करावे?" दरम्यान, शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या नियमांपासून दूर ठेवावे आणि शेतीमध्ये कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालू नये, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनांमुळे सरकारवर मोठा दबाव या वर्षी युरोपातील अनेक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या आंदोलनांमुळे सरकारवर मोठा दबाव आहे. गेल्या आठवड्यात, युरोपियन कमिशनने शेतकऱ्यांना काही सवलती देखील दिल्या आहेत, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांशी एक गोलमेज बैठक घेतली, जिथे त्यांनी शेतकऱ्यांना करात सूट देण्याचे आश्वासन दिले.