नैरोबी : ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केनियातील धर्मगुरूच्या उपदेशावरून अनेक दिवस उपवास केल्याने मरण पावलेल्या २१ अनुयायांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये बालकांचाही समावेश आहे. केनियातील मालिंदी शहरानजीक शाकाहोला परिसरातल्या जंगलामध्ये हे मृतदेह पुरले होते. असे आणखी मृतदेह मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
उपवास करून ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखविणारा धर्मगुरू पॉल मॅकेन्झी थेंगे याला पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवस उपवासामुळे मरण पावलेल्या लोकांची ५८ थडगी पोलिसांनी शोधून काढली आहेत. त्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे व ते उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांना तपास करताना धर्मगुरू पॉलविषयी माहिती मिळाली होती. त्याने केलेल्या उपदेशामुळे तीन गावांतील काही लोकांनी अनेक दिवस उपवास केले व त्यातच त्यांचा अंत झाला. त्यात काही युवकांचाही समावेश होता. (वृत्तसंस्था)