इस्लामाबाद - पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका बसला आहे. दहशतवादी संघटनांना निधी पुरवणा-या देशांवर नजर ठेवणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकलं आहे. याचा अर्थ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर नजर ठेवली जाणार आहे. पाकिस्तानसाठी हा अजूनही मोठा झटका आहे कारण प्रत्येक परिस्थितीत त्यांची साथ देणा-या चीनने यावेळी मात्र त्यांना समर्थन दिलं नसून या मुद्द्यावर माघार घेतली आहे. चीनने आधी या प्रस्तावावर आक्षेप घेतला होता, मात्र नंतर विरोध मागे घेतला. यानंतर सर्वसहमतीने पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या FATF च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानला याआधी पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात वर्ष 2012 ते 15 दरम्यान वॉच लिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं. मात्र यावेळी दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गतवर्षी दक्षिण आशियासंबंधी आपली धोरणं जाहीर केली होती. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना आश्रय देण्यावरुन चेतावणी दिली होती. पाकिस्तान सुधारला नाही तर परिणाम भोगायला तयार रहा असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले शब्द खरे करत पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली आहे.
खोटा ठरला पाकिस्तानचा दावा - पाकिस्तानने 21 फेब्रुवारीला FATF ची बैठक यशस्वी झाल्याचा दावा केला होता. आयसीआरजीच्या प्राथमिक बैठकीत पाकिस्तानला पुन्हा एकदा वॉच लिस्टमध्ये टाकण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली नव्हती. त्यावेळी भारत आणि अमेरिकेच्या अधिका-यांनी पाकिस्तानचा दावा बालिश असल्याचं सांगत अजून अंतिम निर्णय घेणं बाकी असल्याचं सांगितलं होतं.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी मॉस्कोमधून ट्विट करत तीन महिन्यांचा वेळ मिळाल्याचा दावा केला होता. यादरम्यान पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकलं जाऊ नये यासाठी बाजू मांडण्याची संधी मिळेल असं ते बोलले होते. आपल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावाही त्यांनी केला होता. पाकिस्तानी मीडियाने चीन, टर्की, सौदीकडून समर्थन मिळाल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. तुमच्या माहितीसाठी, आयसीआरजीमध्ये अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सने पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट' मध्ये टाकण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं.