चीन - नऊ महिन्यांपूर्वी घरातूनच अपहरण झालेल्या मुलाचा शोध त्याच्या वडिलांनी नुकताच लावला. पोलिसांनीही ज्या प्रकरणात हार पत्कारली त्या प्रकरणात शेवटी वडिलांनीच बाजी मारली. आपल्या मुलाला पळवून नेणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुसक्या तर त्यांनीच आवळल्या शिवाय पुढे होणाऱ्या मोठ्या रॅकेटचाही पर्दाफाश झाला आहे. वडिलांनी अपहरणकर्त्यांना पकडल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
२७ मे २०१६ रोजी चेन झांगहांग हे त्यांच्या घरी त्यांचा सहा वर्षांचा मुलगा चांग झीफू आणि झीफूची मोठी बहिण टीव्ही पाहत बसले होते. काही वेळाने चेन हे कामानिमित्त बाहेर निघून गेले. ते बाहेर निघून गेल्यानंतर काहीजण त्यांच्या घरात शिरले व चांग झीफूचं अपहरण केलं. बाहेर काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने त्यांचे शेजारी धावतच झीफूच्या घरी आले, तेव्हा झीफूचं अपहरण झाल्याचं तिच्या बहिणीने घाबरत घाबरत सांगितलं. हे अपहरणकर्ते म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून मानवी तस्करी करणारी टोळी होती. त्यामुळे हा प्रकार पोलीस ठाण्यातही नोंदवण्यात आला. मात्र पोलिसानांही त्या मुलाचा शोध घेता आला नाही. पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेण्यासाठी जंग-जंग पछाडलं. मात्र अपहरण झालेला चांग काही सापडला नाही. त्यानंतर त्याचे वडिल त्यांच्यापरीने त्या अपहरणकर्त्यांच्या शोधातच होते.
आणखी वाचा - दोन भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न
बरोबर नऊ महिन्यानंतर म्हणजेच २१ फेब्रुवारी २०१७ रोजी किंझिंग टाऊन प्लाझाच्या शॉपिंग मॉलमध्ये अपहरण झालेल्या मुलाचे वडिल फिरत असताना त्यांना त्यांचा मुलगा तीन माणसांसोबत असल्याचं निदर्शनासं आलं. त्यांनी त्वरीत जाऊन आपल्या मुलाची त्यांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनाही लगेच पाचारण करण्यात आलं. सुदैवाने ते तीनही आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं. हा सगळा प्रकार आता उजेडात येण्याचं कारण म्हणजेच नुकतंच या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. या मुलाचं अपहरण करण्यामागचा उद्देशही आता स्पष्ट झाला आहे. अपहरण झालेल्या मुलाची विक्री केली जाणार होती. या मानवी तस्करी करणाऱ्या साखळीने अनेक चिमुकल्यांचं अपहरण केलं होतं. या चिमुकल्यांना दुसऱ्याच कुटूंबात विकण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र झीफूच्या वडिलांच्या तत्परतेमुळे हा डाव फसला आहे. त्यामुळे या आरोपींना अटक झाल्याने केवळ झीफूचाच जीव वाचला नसून अनेक चिमुकल्यांचा जीव वाचला आहे. चेन, ली आणि ओयू अशी या आरोपींची आडनावं आहेत. किंझिंग कोर्टाने या आरोपींना ६ वर्षांचा कारावास आणि ९८ हजारांचा दंड ठोठावला आहे.
सौजन्य - www.dailymail.co.uk