शुक्राणू दानाद्वारे विविध देशांतील ५५० हून अधिक मुलांचा जैविक पिता बनलेल्या नेदरलँडमधील एका व्यक्तीवर शुक्रवारी कोर्टाने आणखी शुक्राणू दान करण्यास बंदी घातली.
जोनाथन जेकब मायर (४१) याने पुन्हा शुक्राणू दानाचा प्रयत्न केल्यास १ लाख युरोचा दंड होऊ शकतो. २०१७ मध्ये १०० पेक्षा जास्त मुलांचा जैविक पिता असल्याचे समोर आल्यानंतर नेदरलँडमधील प्रजनन क्लिनिकमध्ये शुक्राणू देण्यास त्याच्यावर बंदी घातली होती. तरीही तो परदेशात आणि ऑनलाइन शुक्राणू दान करायचा.
डच मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्पर्म डोनरला १२ मातांद्वारे जास्तीत जास्त २५ मुले जन्माला घालण्याची परवानगी आहे. पण, आपल्या पार्श्वभूमीबाबत तो संभाव्य पालकांची दिशाभूल करायचा असा आरोप आहे. हेगमधील न्यायालयाने शुक्राणू दान केलेल्या परदेशातील सर्व क्लिनिकची यादी त्याच्याकडे मागितली असून त्याचे शुक्राणू नष्ट करण्याचे आदेश दिलेत. डोनरकाईंड फाऊंडेशन आणि एका महिलेने त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.