हेग : कृत्रिम गर्भधारणेसाठी शुक्राणूंचे दान करून ५५० मुलांचा जनक ठरलेल्या नेदरलँडमधील जोनाथन जेकब मेजर (वय ४१) याने व्यभिचार व फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर इव्हा नावाच्या डच महिलेने खटला दाखल केला आहे. त्याने नेदरलँडमधील अनेक रुग्णालयांची दिशाभूल केल्याचाही दावा या महिलेने केला आहे.
जोनाथन १३ रुग्णालयांना शुक्राणूंचे दान करतो. त्यातील ११ रुग्णालये नेदरलँडमध्ये आहेत. तो पेशाने संगीतकार असून, सध्या केनियामध्ये त्याचे वास्तव्य आहे. त्याने केलेल्या शुक्राणू दानातून संततीप्राप्ती झालेली महिला व २५ कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारी डोनरकाईंड फाउंडेशन ही संस्था यांनी त्याच्यावर खटला दाखल केला.
जोनाथनने आणखी महिलांना शुक्राणूदान करण्यास बंदी घालावी या मागणीसाठी इव्हा ही महिला व डोनरकाईंड फाउंडेशनने हा खटला दाखल केला. त्याने किती रुग्णालयांमध्ये शुक्राणूदान केले आहे त्याची माहिती लोकांना मिळायला हवी, असे या फाउंडेशनने याचिकेत म्हटले आहे. विविध रुग्णालयांत जोनाथनचे जतन करून ठेवलेले शुक्राणू नष्ट करण्यात यावेत, असेही या याचिकेत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
इतर देशातही शुक्राणूदानशुक्राणूदान हा त्याचा व्यवसाय बनला असून, त्याचे नाव नेदरलँडने काळ्या यादीत टाकले आहे. तो युक्रेन, डेन्मार्कसारख्या देशांतील महिलांसाठी शुक्राणूदान करत असल्याचे आढळून आले आहे.
‘त्या’ भावंडांना बसला धक्का...दात्याने १२ पेक्षा जास्त महिलांना शुक्राणूदान करू नये तसेच या प्रक्रियेद्वारे २५ पेक्षा जास्त मुलांचा जनक होऊ नये असा नियम आहे; पण जोनाथनने हा नियम गुंडाळून ठेवला. त्याच्या शुक्राणूदानामुळे जन्माला आलेल्या मुलांना जेव्हा कळते की आपल्याला शेकडो भावंडे आहेत, त्यावेळी त्यांच्या मनावर परिणाम होतो असे आढळून आले आहे. हेच मुद्दे घेऊन खटला दाखल करण्यात आला.