जिनिव्हा : १९८४ मध्ये अपहरण झालेल्या विमानात आपले वडील होते, असा गौप्यस्फोट करीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय आणि त्यावेळी सरकारमध्ये असलेल्यांबद्दल आपल्या मनात विशेष भावना आहेत, असे येथे सांगितले.
१९९९ च्या विमान अपहरणाशी संबंधित 'आयसी ८१४' या वेबसिरीजबाबत एका कार्यक्रमात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर जयशंकर यांनी हा गौप्यस्फोट केला. अपहरणाचे प्रकरण हाताळणाऱ्या पथकातील एक तरुण अधिकारी म्हणून आणि दुसरीकडे सरकारवर दबाव टाकणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांपैकी एकाचा घटक म्हणून त्यांची काय भावना होती, हे जयशंकर यांनी या वेळी सांगितले.
आयसी ८१४' या वेबसिरीजमध्ये नोकरशाह आणि सरकार यांच्यातील वाटाघाटी अत्यंत ढिसाळ पद्धतीने दाखविण्यात आल्या असे मला कळाले, असे सांगत जयशंकर यांनी आपण ही वेबसिरीज पाहिली नसल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी स्वतःचे १९८४ च्या अपहरणाबाबतचे अनुभव सांगितले.
५ जुलै १९८४ रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पठाणकोटहून अपहरण करून ते दुबईला नेण्यात आले होते. जयशंकर तेव्हा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते आणि निवृत्तीनंतर आता ते परराष्ट्रमंत्री आहेत.
आईला सांगितले, मी येऊ शकत नाही...
'१९८४ मध्ये मी अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करणाऱ्या पथकातील तरुण अधिकारी होतो. मी माझ्या आईला सांगितले की, विमानाचे अपहरण झाले आणि घरी येऊ शकत नाही. नंतर मला कळाले की, विमानात माझे वडील आहेत. विमान अखेर दुबईत सुखरूप उतरले. हे फार लांबलचक कथानक आहे, परंतु सुदैवाने या प्रकरणात कोणीही मृत्युमुखी पडले नाही,' असे ते म्हणाले.