वॉश्गिंटन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईबाबत विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनाही कळवण्यात आले नाही असा दावा व्हाइट हाऊसनं केला आहे. न्यायविभाग स्वातंत्र्यपद्धतीने काम करत असतो त्यामुळे ट्रम्प यांच्या घरी छापेमारी करणार असल्याची माहिती कारवाईआधी देण्यात आली नाही असं व्हाइट हाऊसनं सांगितले आहे.
FBI नं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानावर छापा टाकला. याठिकाणी एफबीआयनं १२ बॉक्स जप्त केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदन जारी करत या कारवाईची माहिती दिली. पाम बीच स्थित मार ए लोगो याठिकाणी एफबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकत जप्तीची कारवाई केली आहे. अमेरिकेसाठी हा काळा दिवस आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासोबत यापूर्वी असे कधीच घडले नाही. न्यायिक यंत्रणांचा हत्यार म्हणून चुकीचा वापर करण्याचा हा प्रकार आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला.
तर ट्रम्प यांच्या घरी कारवाई करणार असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष कार्यालयाला कळवली नव्हती. याबाबत कुठलीही माहिती ज्यो बायडन यांना नव्हती. व्हाइट हाऊसलाही माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी छापा टाकणार असल्याचं एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले नव्हते असा दावा व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जीन पियरे यांनी माध्यमांना म्हटलं.
काय आहे प्रकरण?मिळालेल्या माहितीनुसार, एफबीआयनं काही महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी हा छापा टाकला. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कागदपत्रे फ्लोरिडा येथील निवासस्थानी आणल्याची माहिती होती. न्याय विभाग ट्रम्प यांच्याविरोधातील २ प्रकरणाचा तपास करत आहे. पहिलं प्रकरण २०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालात फेरफार करणे आणि दुसरं प्रकरण कागदपत्रे लपवणे याबाबत आहे. एप्रिल-मेमध्येही तपास यंत्रणांनी फ्लोरिडा येथील ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांशी चौकशी केली होती.
एजेंसी प्रेसिडेंशियल रिकोर्ड एक्टचं उल्लंघन केल्याप्रकरणी FBI तपास करत आहे. नॅशनल आर्चीज अँन्ड रेकॉर्ड एडमिनिस्ट्रेशननं (NARA) २०२२ मध्ये व्हाइट हाऊसमधील महत्त्वाच्या कागदपत्रांची १५ बॉक्स जप्त केली होती. हे बॉक्स मार-ए-लोगो पाठवले होते. त्यावेळी NARA ने म्हटलं होतं की, नियमानुसार ही कागदपत्रे आमच्याकडे पाठवणार होती परंतु ती ट्रम्प यांनी त्यांच्यासोबत नेली असा आरोप त्यांच्यावर आहे.