नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावाची बारकाई छाननी करण्याचा सरकार विचार करीत आहे. चीनने तंत्रशास्त्र संपत्ती संपादित केल्यामुळे अस्वस्थता वाढल्याने सरकार अधिक काटेकोर छाननी करु पाहत आहे. यासाठी अर्थ आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित मंत्रालयाशी उद्योग खाते चर्चा करीत आहे, असे उद्योग सचिव गुरुप्रसाद मोहपात्रा यांनी सांगितले.
सध्याच्या नियमानुसार भारतीय रिझर्व्ह बँक गुंतवणुकीसाठी प्रस्ताव देणाऱ्या कंपन्यांकडून माहिती मागवते. गेल्या पाच वर्षांत सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीबाबत अनेक क्षेत्रांसाठी नियम शिथिल करण्यात आल्यापासून विदेशी गुंतवणुकीसाठी भारतीय अर्थव्यवस्था खुली असल्याचे सरकार सांगत आहे. एप्रिल २०१९ पासून सुरु झालेल्या वित्तीय वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत भारतात २६ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आली आहे. मात्र जगभरातील अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने विदेशी गुंतवणुकीला आळा घातला आहे.