क्षणोक्षणी मृत्यूचे भय, ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत

By योगेश पांडे | Published: February 25, 2022 11:28 AM2022-02-25T11:28:32+5:302022-02-25T11:29:05+5:30

युक्रेनच्या राजधानीतून ‘एरोस्पेस सायंटिस्ट’चा ‘आंखो देखा हाल’

Fear of instant death Indian Spirit alive russia ukraine conflict vladimir putin ground report see what exactly going on | क्षणोक्षणी मृत्यूचे भय, ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत

क्षणोक्षणी मृत्यूचे भय, ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत

Next

योगेश पांडे

सातत्याने बॉम्बचे आवाज, आजुबाजूचे भेदरलेले चेहरे, सर्व दुकाने बंद असल्यामुळे दैनंदिन गोष्टींचा तुटवडा अन् अशास्थितीत आपल्या मायभूमीची लागलेली आस. कोणत्याही क्षणी एखाद्या बॉम्बच्या स्वरुपात मृत्यू समोर उभा ठाकण्याची शक्यता असतानादेखील युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये भारतीय लोकांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. पावलापावलावर मृत्यूचे भय असतानाही ‘इंडियन स्पिरीट’ जिवंत असल्याचे दिसून येत आहे. ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून भारतीय लोक एकमेकांच्या सहकार्याने रस्तेमार्गाने युक्रेनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत. मूळचे नागपुरातील व मागील १७ वर्षांपासून युक्रेनमध्ये असलेले एरोस्पेस सायंटिस्ट राजेश मुनेश्वर यांनी हा ‘आंखो देखा हाल’ ‘लोकमत’ला सांगितला आहे.

राजेश हे त्यांची पत्नी व मुलासह कीव्हमध्ये राहतात. सर्व हवाई वाहतूक बंद असल्याने भारतात परतण्यासाठी इतरांप्रमाणे त्यांचीदेखील धडपड सुरू आहे. युक्रेनच्या विविध शहरांमध्ये हल्ला झाल्यानंतर कीव्हजवळच रशियन सैन्याने हेलिकॉप्टरदेखील पाडले. सातत्याने आम्हाला बॉम्बहल्ल्यांचा आवाज ऐकू येत आहे. युक्रेनच्या सैन्याचादेखील प्रतिकार सुरू आहे. मात्र, कीव्हमधील दोन्ही विमानतळ बंद करण्यात आले आहेत.

विमानतळाकडे निघालेले अनेक भारतीय नागरिक व विद्यार्थी रस्त्यांवर अर्ध्यातच अडकले आहेत. कीव्हमध्ये भारतीय दुतावास तसेच भारतीय नागरिकांनी अशा विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्यासाठी धाव घेतली आहे. काही लोकांना घरी तर काहींना शाळांत ठेवण्यात आले. अनेक विद्यार्थी कीव्हमधील भारतीय दुतावासासमोर जमले. या विद्यार्थ्यांना बसेसने रोमानियात नेणार आहेत. परंतु, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचे राजेश मुनेश्वर यांनी सांगितले. त्यांनी स्पेस लाॅन्च व्हेईकल प्रकल्पात युक्रेन सरकारसोबत काम केले आहे, हे विशेष.

सर्व दुकाने बंद, विद्यार्थ्यांचे हाल

  • हल्ला झाल्यानंतर युक्रेनच्या राजधानीतील सर्व दुकाने बंद झाली आहेत. तेथील सरकारने विशिष्ट शिबिरेदेखील लावलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली. 
  •  खाण्या-पिण्याच्या साहित्याचा तुटवडा आहे. आम्ही अगोदरपासूनच व्यवस्था केली होती व त्यातूनच भारतीय लोक इतर विद्यार्थ्यांची मदत करत आहेत.
     

डोळ्यांनी दिसताहेत आगीच्या ज्वाळा

  • राजेशच्या घरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या झुलियानी विमानतळावर कधीही हल्ला होण्याची शक्यता आहे. 
  • पोलंड व रोमानिया या दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत व हा आशेचा मोठा किरण असल्याचे राजेश यांनी ‘लोकमत’ला सांगितले. डोळ्यांनी आगीच्या ज्वाळा पाहिल्या असून, काहीही करून मायदेशात परतायचे आहे. 
     

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना कतारमार्गे भारतात परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत आणि कतारमध्ये द्विपक्षीय बबल करारानुसार त्यांना प्रवास करता येईल. मात्र, युक्रेन ते कतारपर्यंतचे अंतर ४ हजार ५०० किलाेमीटर एवढे आहे. त्यामुळे कतारला कसे जावे, हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विमानाची साेय करावी; विद्यार्थ्यांचा टाहाे
विद्यार्थ्यांची भारतात परतण्यासाठी धडपड सुरू आहे. शिव कार्तिक नावाच्या विद्यार्थ्याने तेथील परिस्थिती मांडली. 
ताे एअर इंडियाचे विमान पकडण्यााठी विमानतळावर पाेहाेचला. मात्र, हवाई हद्द बंद झाल्याचे तेथे गेल्यावर समजले. 
ताे म्हणाला, ‘विमानतळावरून विद्यापीठात परतणे शक्य नव्हते. त्यामुळे युक्रेनची राजधानी किव्ह येथील रेल्वे स्थानकावर आम्ही ५० विद्यार्थी अडकलेलाे आहाेत. परतण्यासाठी विमानाची साेय करावी.

Web Title: Fear of instant death Indian Spirit alive russia ukraine conflict vladimir putin ground report see what exactly going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.