काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी तालिबानची मदत करणाऱ्या पाकिस्तानला आता आपल्याच सीमेवर संघर्ष करावा लागत आहे. तालिबानने पुन्हा एकदा डूरंड लाईनवर भीषण हल्ला केला आहे. तालिबानच्या बद्री युनिटच्या कमांडरने याची घोषणा केली असून पाकिस्तानी सैन्यासोबत भीषण लढाई सुरु झाल्याचे सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे तालिबानला टीटीपी दहशतवाद्यांचा पाठिंबा मिळाला असून ते देखील या लढाईत उतरले आहेत.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आपल्या क्षेत्रातच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केली होती. यानंतर मंगळवारी पाकिस्तानी तालिबानचा गड असलेल्या उत्तर-पश्चिमी पाकिस्तानमध्ये एका घरावर ड्रोनद्वारे पाकिस्तानने हल्ला केला होता. या कारवायांनंतर डूरंड लाईनवर तालिबानने जोरदार हल्ला केला आहे.
भारताविरोधात दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादच पोखरू लागला आहे. भारताविरोधात लढण्याची ताकद त्यांना आता त्यांनीच उभ्या केलेल्या संघटनांविरोधात वापरावी लागत आहे. या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेसोबत हातमिळवणी केली आहे. १० मे रोजी यासाठी दोन्ही देशांनी चर्चा केली आहे.
पाकिस्तानतही आता दहशतवादी हल्ले होऊ लागले आहेत. बहुतांश हल्ल्यांची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने घेतलेली आहे. या दहशतवादी संघटनेला तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आसरा दिला आहे. तालिबानने हे आरोप अनेकदा फेटाळले आहेत.