पाकिस्तानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. येथे पिंडी भट्टियां शहरात एका बसला आग लागली. ज्यात 30 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 40 हून अधिक लोक प्रवास करत होते.
जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, ज्या बसला आग लागली ती बस कराचीहून इस्लामाबादला जात होती. बस आपल्या वेगात जात असताना पिकअप व्हॅनला धडकली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल भरण्यात आले होते. यामुळेच धडकेनंतर बसला आग लागली. हा अपघात इतका भीषण होता की, यात अनेक लोकांचा मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी बचावकार्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बस पिंडी भट्टियांजवळ पोहोचल्यावर हा अपघात झाला. येथे पोहोचताच बसमध्ये मोठी आग लागली. बसमधून आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट येत होते. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली.
याआधी खैबर पख्तुनख्वाच्या उत्तर वजीरीस्तानच्या शव्वाल तहसीलमध्येही मोठी दुर्घटना घडली होती. येथे एका व्हॅनमध्ये स्फोट झाला, त्यात 11 मजुरांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात दोन मजूरही जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शव्वाल तहसीलमधील गुल मीरकोटजवळ हा स्फोट झाला. येथून लष्करी ताफा जात होता, त्यानंतर आयईडीचा स्फोट झाला, ज्यामध्ये मजुरांचा मृत्यू झाला.