पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाची पाचवी लाट सुरू झाली आहे. ती आधीच्या लाटांपेक्षा अधिक धोकादायक आहे असे त्या देशाचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरन यांनी सांगितले. या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे अधिक काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ते म्हणाले की, लसीकरणाचा वेग वाढवून तसेच स्वच्छतेचे नियम पाळून फ्रान्समधील पाचव्या लाटेचा जोर कमी करता येईल. कदाचित या लाटेवर फ्रान्स वेगाने मात करण्याची शक्यता आहे. त्या देशात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या ७३.४६ लाख आहे. या संसर्गामुळे फ्रान्समध्ये १.१९ लाख लोकांचा मृत्यू झाला. कोणत्याही देशात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली आहे. १९१८ ते १९२० या कालावधीत स्पॅनिश फ्लूमुळे जगभरात ५० कोटी लोक आजारी पडले होते व पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. या आजाराच्या दुसऱ्या लाटेने पूर्वीपेक्षाही जास्त कहर माजविला होता.
अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप वाढले. यंदाच्या वर्षाच्या प्रारंभी युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड, स्पेन, स्वीडन आदी देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला होता. (वृत्तसंस्था)
रशियातील भरपगारी शटडाऊन संपुष्टात
रशियातील कोरोना साथीचा फैलाव रोखण्याकरिता ३० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत लागू केलेला आठवडाभराचा शटडाऊन सोमवारी सकाळी संपुष्टात आला. तेथील लोकांना सात दिवस भरपगारी रजा देण्यात आली होती. सध्या या देशात कोरोनाचे हजारो नवे रुग्ण सापडत आहेत, तर दरदिवशी हजार लोकांचा या संसर्गाने मृत्यू होत आहे. अशी स्थिती असूनही रशियातील पाच प्रांतवगळता इतर प्रांतांनी या शटडाऊनची मुदत वाढविली नाही.