दक्षिण रशियातील येयस्क शहरात एक लष्करी विमान निवासी इमारतींवर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर इमारतींना मोठी आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेकऑफ नंतर सुखोई एसयू-34 या फायटर जेटच्या इंजिनवर एक पक्षी धडकला, यामुळे इंजिनमध्ये आग लागली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच 6 जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, संबधित विमानाच्या पायलटने अखेरच्या वेळी इजेक्ट केले. तसेच विमानात युद्धसामग्री असल्याने स्फोट मोठा झाल्याचेही वृत्त आहे.
या अपघातानंतर इमारतींना लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. यातच SU-34 च्या एका इंजिनमध्ये उड्डाणानंतर आग लागल्याने ते खाली खोसळले. विमानातील दोन्ही क्रू मेंबर्स सुखरूप बाहेर पडले आहेत. या दुर्घटनेत किमान 15 अपार्टमेंट्सचे नुकसान झाले आहे, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
रशियातील गोळीबारात 11 जणांचा मृत्यू, 15 जखमी -यापूर्वी 15 ऑक्टोबरला युक्रेनजवळील रशियन लष्करी फायरिंग रेंजमध्ये दोन जणांनी सैनिकांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात 11 जमांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाले होते. यासंदर्भात बोलताना, मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य रशियाच्या बेल्गोरोड भागात शनिवारी गोळीबार झाला. माजी सोव्हिएत प्रजासत्ताकातील दोन अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य अभ्यासादरम्यान स्वयंसेवक सैनिकांवर गोळीबार केला. यानंतर करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.