लास वेगास- लास वेगासमधील एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अंदाधुंद गोळीबार करून 58 लोकांचा जीव घेणारा हल्लेखोर स्टिफन पॅडॉक निवाडमध्ये आरामदायी आयुष्य जगणारा होता. स्टिफनने रिअर इस्टेटच्या व्यवसायातून करोडो रूपये कमावले होते. तसंच पॅडॉकची संपूर्ण अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी प्रॉपर्टी होती. स्टिफनच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार स्टिफनला झुगारात पैसे लावायची सवय होती.
स्टिफनची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तो रविवारी रात्री ‘मंडाले बे हॉटेल अँड कसिनोच्या 32 व्या मजल्यावर 17 बंदूका घेऊन नक्की का आला होता?, याबद्दलचा कुठलाही संकेत मिळत नाही. स्टिफनच्या घरची माणसं तसंच पोलीस अधिकारी त्याने हल्ला करण्यामागची कारणं शोधू शकत नसल्याचं समजतं आहे. वाहतूक नियम मोडल्याच्या किरकोळ गुन्ह्यांखेरीज त्याच्या अन्य कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलिसांच्या दफ्तरी नोंद नाही. स्टिफनने हल्ला करण्याची संभाव्य योजना आखली होती. तो जवळपास 10 सुटकेससह हॉटेलमध्ये गेला होता.
'या प्रकरणी मी काहीही बोलू शकत नाही, असं घाबरलेल्या स्टिफनच्या भावाने पत्रकारांना सांगितलं. स्टिफनचा भाऊ एरिकने काही दिवसांपूर्वी स्टिफनने पाठविलेला मेसेज दाखविला. त्या मेसेजमध्ये स्टिफनने झुगारात चाळीस हजार डॉलर जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. स्टिफन हा अब्जाधीश असल्यातं त्याचा भाऊ एरिकने सांगितलं आहे. स्टिफन जेव्हा झुगारात पैस जिंकायचा तेव्हा तो मला सांगायचा, पैस हारल्यावर तो त्याबद्दलची माझ्याकडे तक्रारही करायचा, असं एरिकने सांगितलं आहे.
काय घडलं लास वेगासमध्ये?लास वेगस बुलेवर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील हमरस्त्याच्या एका बाजूला एमजीएम रिसॉर्ट्स इंटरनॅशनल या कंपनीची ‘मंडाले बे हॉटेल अँड कसिनो’ची ४५ मजली टोलेजंग इमारत आहे. त्याच्या बरोबर समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला याच कंपनीचे विविध मनोरंजन कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जाणारे खुल्या मैदानातील प्रेक्षागार आहे. हा संगीत महोत्सव याच खुल्या मैदानात सुरु होता. सर्वात भयावह गोष्ट अशी की समोरच्या ‘मंडाले बे हॉटेल’च्या बऱ्याच वरच्या मजल्यावरून खाली मैदानात सुरू असलेल्या संगीत महोत्सवाच्या श्रोत्यांवर हल्लेखोराने हा गोळीबार केला. इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ जण ठार झाले.
लास वेगासमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराचा इसिसशी काही संबंध नाही - एफबीआय एफबीआयने अमेरिकेतील लास वेगासमध्ये म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या गोळीबाराचा दहशतवादाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. इसिसने हल्ल्याची जबाबदारी घेत आपल्याच दहशतवाद्याने गोळीबार केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र एफबीआयने या हल्ल्यामागे इसिसचा हात असल्याची शक्यता नाकारली आहे. दुसरकीडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले हे कृत्य असल्याचं म्हटलं आहे.