मंडाले- म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी उत्तर राखिन प्रांताचा दौरा सुरु केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती. सू की या प्रकरणामध्ये कोणतीही भूमिका घेत नसून त्या रोहिंग्याच्या संरक्षणामध्ये कमी पडत आहेत अशी टीका त्यांच्यावर आंतररराष्ट्रीय समुदायाकडूनही होत होती.24 ऑगस्टपासून राखिन प्रांतातून 6 लाख रोहिंग्या बांगलादेशाच्या दिशेने पळाल्याचे सांगण्यात येते. म्यानमारच्या लष्कराकडून होणारी कथित कारवाई, बलात्कार, जाळपोळ आणि हत्या यांना घाबरून ते देश सोडून गेल्याचे सांगितले जाते. "स्टेट कौन्सिलर (आंग सान सू की) सित्वे येथे गेल्या असून त्या मंगडौ आणि बुथिंगडॉंग येथेही जातील", असे सरकारच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.2012 पासून म्यानमारमधील राखिन प्रांतातील वांशिक दंगलीनंतर सू की पहिल्यांदाच या प्रांताच्या दौऱ्यावर जात आहेत. जाळपोळ करण्यात आलेल्या रोहिंग्यांच्या गावांमध्ये त्या जातील की नाही याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही. रोहिंग्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या कमी पडल्याबद्दल त्यांच्यावर विविध देशांनी टीका केली होती. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत न जाता सू की यांनी आपल्याच देशात मोठी परिषद घेऊन सरकार रोहिंग्यांसाठी काय करत आहेत याची माहिती सर्वांना दिली होती. सध्या बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांना तेथे स्वच्छतेचे प्रश्न, शुद्धध पाणी तसेच औषधांचा तुटवडा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची भेट घेतल्यानंतर म्यानमारला आपल्या नागरिकांना माघारी बोलवावेच लागेल असे विधान केले होते.
डेस्मंड टूटू यांचे पत्रआंग सान सू की यांना दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेस्मंड टूटू यांनी पत्र लिहून राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करावी अशी विनंती केली आहे. संपुर्ण जग तुला अन्यायाविरोधात लढणारी, स्वातंत्र्यासाठी लढणारी म्हणून आदर्श मानते. तुमच्या देशात चालू असलेला विवाद लवकर मिटवावा अशी अपेक्षा टूटू यांनी व्यक्त केली आहे.