हरारे : लष्कर, देशातील जनता आणि सत्ताधारी पक्ष या सर्वांची एकमुखी मागणी झुगारून सत्तेला चिकटून राहिलेले ९३ वर्षांचे रॉबर्ट मुगाबे यांनी अखेर मंगळवारी झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अशा प्रकारे ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ३७ वर्षे सुरु असलेली मुगाबे यांची सत्ता संपुष्टात आली.मुगाबे यांच्या राजीनाम्याचे वृत्त जाहीर होताच त्यांच्या पदत्यागासाठी रस्त्यावर उतरलेल्या झिब्म्बाब्वेच्या लाखो नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले शासक व ‘ग्रँड ओल्ड मॅन आॅफ आफ्रिकन पॉलिटिक्स’ म्हणून ओळखले जाणारे मुगाबे नेमके कुठे आहेत, हे स्पष्ट झाले नाही. गेले आठवडाभर देशात त्यांच्याविरुद्ध उठाव सुरु असताना मुगाबे लष्कराच्या नजरकैदेत राहून सत्तेला चिकटून बसले होते.सत्ताधारी ‘झानु-पीएफ’ पक्षाने मुगाबे यांना पक्षाध्यक्ष पदावरून दूर करून राष्ट्राध्यक्ष पदावरून स्वत:हून पायउतार होण्यासाठी सोमवार दुपारपर्यंतची मुदत दिली होती. परंतु ती झुगारत मुगाबे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत राष्ट्राला उद्देशून भाषण कले व त्यात सत्ता न सोडण्याचे संकेत दिले. त्यामुळे ‘झानु-पीफ’ पक्षाने आधी जाहीर केल्याप्रमाणे संसदेच्या अध्यक्षांना मुगाबे यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याची औपचारिक नोटीस दिली. त्यानुसार अध्यक्षांनी लगेच एका हॉटेलमध्ये दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरवून महाभियोगाची कारवाई सुरु केली.बाहेर हजारो नागरिकांची मुगाबेविरोधी निदर्शने सुरु होती.परंतु हा महाभियोग पुढेचालविण्याची गरजच पडली नाही. कारण मुगाबे यांनी आपला राजीनामा संसदेच्या अध्यक्षांकडे पाठवून दिला. अध्यक्षांनी महाभियोग तहकूब केला आणि ही बातमी बाहेर येऊन रस्त्यावर जमलेल्या नागरिकांना जाहीर केली.महाभियोगाने पदच्यूत होण्याची नामुष्की येण्यापेक्षा स्वत:हून राजीनामा दिलेला बरा, याची जाणीव मुगाबे यांना झाली होती. कारण मुगाबे यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला फक्त पाच मंत्री व अॅटर्नी जनरल हजर होते. बाकीचे १७ मंत्री सत्ताधारी पक्षाने महाभियोगासाठी बोलावलेल्या बैठकीस गेल होते.उपराष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मानान्गावा यांना मुगाबे यांनी अचानक पदच्यूत केल्यापासून झिम्बाब्वेमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.लष्कराने उघड उठाव करून सत्ता काबीज करण्याऐवजी जनतेचा दबाव व सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्याने मुगाबे यांना दूर करून मानान्गावा यांना सत्तेवर बसविण्याचे गणित मांडले. मुगाबे यांनी देशवासियांच्या भावना लक्षात घेऊन सन्मानाने सत्ता सोडावी यासाठी लष्करप्रमुखांनी अध्यक्षीय प्रासादात मुगाबे यांच्याशी दोन दिवस वाटाघाटी केल्या. परंतू त्यातून काहीच निष्पन्न झाल्याचे दिसत नव्हते.आठवडाभराच्या या उलथापालथीनंतर ‘क्रोकोडाइल’ म्हणून ओळखले जाणारे इमॅन्युअल मानाग्वावा झिम्बाब्वेचे नवे राष्ट्राध्यक्ष होतील, असे दिसते.
अखेर झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 9:51 PM