कराची : बालाकोट हल्ल्यानंतर भारताला सुमारे पाच महिने हवाई हद्द बंद केल्यामुळे पाकिस्तानला तब्बल ५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा फटका बसला. २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने जैशच्या अतिरेकी प्रशिक्षण तळावर हल्ला केला होता व त्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतासाठी बंद केली होती. पुलवामामध्ये जैशच्या आत्मघाती हल्लेखोराने भीषण हल्ला केला होता व त्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हल्ला केला होता. यानंतर भारत व पाक दोन्ही देशांनी एकमेकांना हवाई हद्द बंद केली होती. तथापि, भारताने हवाई हद्द पुन्हा खुली केली असली तरी पाकिस्तानने ही बंदी पाच महिने कायम ठेवली होती. यामुळे भारतीय हवाई कंपन्या व प्रवाशांना मोठा फटका बसला. या हवाई हद्द बंदीमुळे प्रवाशांना आर्थिक फटका तर बसलाच, पण त्यांचा वेळही वाया जात होता. पाकने मागील मंगळवारी सकाळी आपली हवाई हद्द नागरी वाहतुकीसाठी खुली केली.पाकचे हवाई वाहतूकमंत्री गुलाम सरवर खान यांनी गुरुवारी सांगितले की, भारताला हवाई हद्द बंद करण्यात आल्याने नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाला ५० दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला.
हवाई हद्द बंद केल्याने पाकला आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:20 AM