लंडन : इस्लामिक स्टेट आयएसचा घातक सदस्य जिहादी जॉन याचा शोध घ्यावा, असे आदेश ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या गुप्तचर प्रमुखाला दिले आहेत. जिहादी जॉन याने नुकतीच ओलीस ब्रिटिश नागरिक अॅलन हेनिंग याची हत्या केली असून, तसा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. जॉनचा पत्ता लागल्यास त्याला पकडण्यासाठी वा मारण्यासाठी विशेष दल पाठविण्याची ब्रिटनची योजना आहे. ब्रिटिश मदत कार्यकर्ता अॅलन हेनिंगच्या मारेकऱ्याचा शोध घेण्याची मोहीम अधिक वेगवान करण्यात आली आहे, आयएसने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत जिहादी जॉन हेनिंग याचा शिरच्छेद करताना दिसत आहे. संडे टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार कॅमेरून यांनी शनिवारी गुप्तचर संघटना एमआय, एमआय ६ व जीसीएचक्यू यांना चेकर्स रिट्रिट येथे बोलावले व आयएसच्या मारेकऱ्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. अॅलन हेनिंग (४७) चा शिरच्छेद करणारा दहशतवादी जॉन जिहादी हाही ब्रिटिशच आहे. हेनिंगच्या हत्येची चित्रफीत जारी झाल्यानंतर १२ तासांनी ही बैठक घेण्यात आली. सेलफोर्ड येथे राहणारा हेनिंग टॅक्सीचालक होता. हेनिंगचा मेहुणा कोलीन लिवसे व त्याच्या एका मित्राने सरकारने अॅलनला वाचविण्यासाठी काहीही केले नाही असा आरोप केला आहे. तर हेनिंगची विधवा पत्नी बार्बराने या हत्येमुळे कुटुंब अत्यंत दु:खी असल्याचे म्हटले असून, तिने हेनिंगच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. हेनिंगचे अपहरण २६ डिसेंबरला झाले होते. त्यावेळी आयएस सदस्य सिरियात प्रवेश करत होते. (वृत्तसंस्था)
‘इसिस’च्या जॉनला शोधा
By admin | Published: October 06, 2014 12:12 AM