रशियाने गुरुवारी युक्रेन विरोधात युद्धाला सुरुवात केली. रशियाच्या हल्ल्यांनंतर यूक्रेनमध्ये हाहाकार माजला आहे. रशियाने राजधानी कीवला घेरण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. अशा संपूर्ण स्थितीत यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की हतबल झाल्याचे दिसत आहेत, तर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीही हात वर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनच्या वादावरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्याविषयी गुगुलवर देखील विविध पद्धतीने सर्च करण्यात येत आहे. बीबीसी मराठीच्या वृत्तानूसार, लोकांनी त्यांचं नाव आणि त्यांच्याबद्दलची माहिती गुगलवर शोधण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. जाणून घ्या पुतिन यांच्याबद्दल गुगलवर शोधण्यात आलेल्या भन्नाट गोष्टी.
गुगलवर नेमकं काय सर्च केलं?
- पुतिन यांना युक्रेन ताब्यात घ्यायचं आहे?
- व्लादिमीर पुतिन विवाहित आहेत का?
- पुतिन डावखुरे आहेत का?
- पुतिन श्रीमंत आहेत का?
- पुतिन सतत हसत का असतात?
- पुतिन सीरियाला पाठिंबा का देतात?
- पुतिन यांना मुलगा आहे का?
- पुतिन यांना इंग्रजी येतं का?
- पुतिन यांना ट्रम्प आवडतात का?
- पुतिन यांनी मीम्सवर बंदी घातली आहे का?
व्लादिमीर पुतिन यांची राजकीय वाटचाल सर्वश्रुत आहे. रशियामध्ये त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. मोठ्या आणि संपन्न राष्ट्राचे प्रमुख म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय म्हणावी लागेल. त्यांचे श्रीमंत राहणीमान, संपत्ती आणि वैयक्तिक आयुष्य याबाबत आजही लोकांमध्ये उत्सुकता आहे.व्लादिमीर पुतिन हे सार्वजनिक ठिकाणी आपल्या परिवाराविषयी कधीही भाष्य करत नाहीत, तसेच आपल्या मुलींचा उल्लेखही ते सार्वजनिक ठिकाणी टाळतात. जसे त्यांचे कुटुंब हे एक रहस्य आहे, तसेच त्यांची संपत्तीदेखील.
रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक मानले जातात. एका अहवालानुसार पुतिन यांच्याकडे 160 अब्ज पौंड म्हणजेच 16555 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. राजकीय समीक्षक बोरिस नेमत्सोव्ह यांनी पुतिन यांच्याकडे प्रचंड संपत्ती आरोप केला आहे. पुतिन यांच्याकडे 43 विमाने, 7000 कार, 15 हेलिकॉप्टर आणि 4 सुपरयाट आणि सोन्याचं टॉयलेट आहेत. तसेच मॉस्कोच्या बाहेरील भागात अत्यंत सुरक्षित असलेल्या 'बिलेनियर्स विलेज'मध्ये व्लादिमीर पुतिन यांचा भव्य महाल असल्याचा आरोप केला आहे. हा महाल बंकिगहॅम पॅलेसच्या जवळपास दुप्पट आकाराचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.