वॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिका आणि चीनमधील रणनीतिक आणि व्यावसायिक स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, आता हे दोन्ही देश समुद्रात बुडालेल्या एका विमानाला शोधून काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली आहे. अमेरिकी नौदलाचं हे विमान काही दिवसांपूर्वी दक्षिण चीन समुद्रात कोसळलं होतं. या भागावर चीनकडून हक्क सांगण्यात येत असतो मात्र अमेरिकेकडून येथील चीनच्या कब्जाला विरोध केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी फिलिपिन्समध्ये झालेल्या युद्धसरावात भाग घेतलेल्या अमेरिकेच्या यूएसएस कार्ल विन्सन या विमानवाहू युद्धनौकेवरील एफ-३५सी हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे दक्षिण चीन समुद्रात कोसळले होते. यावरील नऊ सैनिक जखमी झाले होते. तर विमान समुद्रतळाशी जाऊन विसावले आहे. याच विमानाचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि चीनकडून आकाश पाताळ एक केले जात आहे.
अमेरिकेसोबतच चीनकडूनही या विमानाचा शोध घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे या विमानातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या विमानाला उडणारा अत्याधुनिक संगणक असे म्हटले जाते. या एका विमानाची किंमत तब्बल ७५० कोटी रुपये एवढी आहे. तसेच या विमानामध्ये असे काही खास तंत्रज्ञान आहे, जे केवळ अमेरिकावगळता अन्य कुठल्याही देशाकडे नाही.
त्यातील काही वैशिष्ट्ये म्हणजे हे विमान चार क्षेपणास्त्रे घेऊन उड्डाण करू शकते. तसेच याचे इंजिन हे जगातील सर्व लढाऊ विमनांमध्ये सर्वात शक्तिशाली मानले जाते. शक्तिशाली इंजिनाच्या मदतीने ते १२ मैल प्रतितास वेगाने उडू शकते. तसेच या विमानाचे पंख मोठे असून, लँडिंग गिअरही जबरदरस्त आहेत. त्यामुळे ते विमानवाहू युद्धनौकेवर सहजपणे उतरते. तसेच हे विमान जमिनीपासून कमी अंतरावर उडून शत्रूला हुलकावणी देण्यामध्येही सक्षम आहे. तसेच सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हे विमान रियल टाइमवर उड्डाण करताना अन्य सामरिक केंद्रे, विमानं आणि उपकरणांशीही जोडले जाऊ शकते.
या विमानामधील या खास वैशिष्ट्यांमुळेच चीनची त्यावर नजर आहे. तसेच समुद्रातून ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर अमेरिका या विमानाला चीनच्या कब्जात जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तज्ज्ञांच्या मते चीनचे नौदल या विमानाजवळ पोहोचले तर अमेरिकेवर मोठी नामुष्की ओढवणार आहे. तसेच चिनी नौदल या विमानाचे अवशेष ताब्याथ घेण्यासाठी अमेरिकी सैन्याशी दोन हात करू शकते.
असे झाल्यास खूप बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या अमेरिकी नौदल या विमानापासून खूप लांबवर आहेत. तसेच या विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील बॅटरी संपण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत हे विमान चिनी नौदलाच्या ताब्यात सापडले तर एफ३५सी चे तंत्रज्ञानसुद्धा चीनच्या हाती लागू शकते. हे तंत्रज्ञान अद्याप चीनकडे नाही. मात्र ते चीनला सापडल्या अमेरिका आणि चीनमधील संघर्षाला नवे वळण लागू शकते.