चीनच्या हेनान प्रांतातील प्रायमरी बोर्डिंग स्कूलच्या हॉस्टेलमध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. चीनची सरकारी मीडिया शिन्हुआनुसार, यानशानपू गावातील स्थानिक लोकांनी शुक्रवारी (19 जानेवारी) रात्री 11 वाजता यिंगकाई शाळेत आग लागल्याची माहिती दिली.
शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, बचावकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि रात्री 11:38 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, मृतांमध्ये नेमके किती विद्यार्थी आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डिंग स्कूलच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सर्वाधिक लोकवस्ती असलेला देश असूनही सुरक्षा मानकांच्या अभावामुळे चीनच्या अनेक प्रांतांमध्ये आगीच्या घटना आणि अशा घटना आता सामान्य झाल्या आहेत.
सोशल मीडियावर लोकांचा रोष
शाळेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर लोकांनी चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला संताप व्यक्त केला आणि सुरक्षेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. न्यूज एजन्सी एएफपीच्या म्हणण्यानुसार, चीनमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिलं, हे खूप भीतीदायक आहे, 13 कुटुंबातील 13 मुलं, सर्व काही क्षणात संपलं.