कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. यात वाहन उद्योगाची स्थितीही नाजूक आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम पुरवठा साखळीवर झाला. कंपन्यांना वाहने पोहोचवणे सर्वात कठीण जात होते. अशात वाहन उद्योगाचे कंबरडे मोडणारी आणखी एक घटना समोर आली आहे. फॉक्सवॅगन ग्रुपच्या हजारो आलिशान गाड्यांनी भरलेले एक मालवाहू जहाज गुरुवारी अटलांटिक महासागरात वाहून गेले आहे. जहाजाला लागलेल्या आगीमुळे या फोक्सवॅगन समूहाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मालवाहू जहाज फोक्सवॅगन ग्रुपची सूमारे चार हजार नवीन वाहने जर्मनीहून अटलांटिक महासागरावाटे अमेरिकेत घेऊन जात होते. 'फेलिसिटी एस' नावाच्या या मालवाहू जहाजाला भर समुद्रात अचानक भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, जहाजावरील सर्व वाहने आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जहाजावीरल 22 क्रू मेंबर्स बचावले.
4,000 वाहनांना जलसमाधीया मालवाहू जहाजात 4,000 आलिशान वाहने होती. ही वाहने जर्मनीहून उत्तर अमेरिकेत नेली जात होती. फोक्सवॅगन समूहाच्या प्रवक्त्याने जहाजावर जळणाऱ्या वाहनांचे ब्रँड नाव उघड केले नाही, परंतु यूएसमध्ये या समुहाच्या पोर्श, ऑडी, लॅम्बोर्गिनी, बेंटले आणि बुगाटी सारखी वाहनांची विक्री होते. यावरुन गाड्या कोणत्या होत्या, याचा अंदाज लावला जात आहे. या अपघातामुळे फोक्सवॅगन समूहाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीच्या कारणांचा सध्या तपास केला जात आहे.