बल्गेरिया देशात एक भीषण अपघात घडला आहे. बल्गेरियातील पश्चिम भागात एका महामार्गावर एका बसमध्ये आग लागली. या आगीच्या घटनेत 46 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय, आगीत जखमी झालेल्या सात जणांना राजधानी सोफिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्या अग्निसुरक्षा विभागाचे प्रमुख निकोलाई निकोलोवी यांनी बीटीव्हीला याबद्दल माहिती दिली.
निकोलाई निकालोवी यांनी सांगितल्यानुसार, बसला लागलेल्या आगीत किमान 46 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे दोन वाजता आगीची घटना घडली. ही घटना एवढी भीषण होती की, आगीमुळे बस पूर्ण जळून खाक झाली आहे. सोफियातील उत्तर मॅसेडोनियाच्या दूतावासाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत बळी पडलेले बहुतांश उत्तर मॅसेडोनियाचे नागरिक आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, सध्या याचा तपास केला जात आहे.
बसमध्ये 53 प्रवासी होतेसोफियाच्या पश्चिमेला सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या स्ट्रुमा हायवेवर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 53 प्रवासी होते. सोफिया येथील आपत्कालीन रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जळलेल्या सात जणांनी जळत्या बसमधून उडी मारली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर बल्गेरियाचे अंतरिम पंतप्रधान स्टीफन यानेव्ह यांनी अपघातस्थळी जाऊन आढावा घेतला.