ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 3 - फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील लुवर संग्रहालयात एक संशयिताकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला असून, त्याला रोखण्यासाठी संग्रहालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकाने गोळीबार केला. दरम्यान, या घुसखोराला अडवताना एक सैनिक जखमी झाला असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर हल्लेखोराकडे एक कुऱ्हाड होती आणि तो अल्लाहू अकबर अशा घोषणा देत होता. हल्ला झाला तेव्हा संग्रहालयात 250 जण उपस्थित होते.
हा हल्लेखोर सुटकेस घेऊन लुवर संग्रहालयात घूसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी या हल्लेखोराने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता सैनिकाने त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात हा हल्लेखोर गंभीर जखमी झाला आहे. मात्र या हल्लेखोराकडे स्फोटके आढळलेली नाहीत.
नारगिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर घटना लुवर परिसरात घडली आहे. असे ट्विट फ्रान्सच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. तर फ्रान्सच्या पंतप्रधानांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला वाटत असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याबरोबरच अफवा पसरवू नका आणि माहितीसाठी सरकारकडून येणाऱ्या माहितीवर लक्ष द्या असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पॅरिस दहशतवादाच्या छायेखाली असून, या शहराला अनेक दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर चोख बंदोबस्त करून, सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.