वॉशिंग्टन - अमेरिकेतील टेक्सास टेक युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची घटना युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या पोलीस विभागात घडली आहे. या गोळीबारात एक अधिका-याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून युनिव्हर्सिटी परिसर पूर्णतः बंद करण्यात आला आहे.
टेक्सास टेक युनिव्हर्सिटीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले. स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर अद्यापही युनिव्हर्सिटीमध्येच आहे. युनिव्हर्सिटीचे प्रवक्ते क्रिस कुक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पस पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांच्या खोलीत अमली पदार्थ (ड्रग्स) आढळली. कुक यांनी सांगितले की, अमली पदार्थ बागळल्याप्रकरणी संशयिताला कॅम्पस पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.
यादरम्यान, संशयितानं बंदुक काढली आणि एका अधिका-याच्या डोक्यावर धरत गोळीबार केला, या घटनेत या अधिका-याचा मृत्यू झाला. यानंतर या संशयितानं पळ काढला आणि अद्यापपर्यंत त्याला पकडण्यात यश आलेले नाही. दरम्यान, हा संशयित कॅम्पसमध्येच लपल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर 6 फूट उंच असून त्याचे केसांना लाल रंगा केला आहे. त्याच्या डोळ्यांचा रंग निळा आहे. हल्लेखोरानं पांढ-या रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच अमेरिकेतील लास वेगसमध्ये एका हल्लेखोरानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात जवळपस 59 जणांचा मृत्यू झाला होता व 500 हून अधिक जण जखमी झाले होते.