इस्लामाबाद : सेक्युरिटी चेकसाठी गाडी न थांबवल्याने गेटवर सुरक्षा देत असलेल्या सैनिकाने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या हवाई दल उपप्रमुखांचा मुलगा जखमी झाला. ही गोळी त्याच्या मणक्यात घुसली असून, त्यामुळे त्याचा कमरेखालचा भाग लुळा पडला आहे.पाकिस्तानचे हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल मुहम्मद अतार शम्स यांचा आठवीत शिकणारा मुलगा मुहम्मद इब्राहिम कारने प्रवास करत होता. त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ बहरिया हाही होता. त्यांची कार नौदल वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ आली. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या सैनिकाने ओळखपत्र दाखविण्यासाठी गाडी थांबवण्याची विनंती केली. मात्र चालकाने न थांबता गाडी दामटली. त्यामुळे सैनिकाने कारच्या दिशेने गोळीबार केला. त्यात मुहम्मद इब्राहिम गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पाकिस्तानी हवाई दलाच्या रुग्णालयामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करुन ही गोळी बाहेर काढण्यात आली असली तरी त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
सिक्युरिटी चेकसाठी गाडी न थांबविल्याने हवाई दल उपप्रमुखांच्या मुलावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 4:59 AM