नवी दिल्ली - भारतीय लष्करानं शनिवारी (23 डिसेंबर) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय लष्कारातील सैनिकांनी नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना यमसदनी धाडले आहे. गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतानं पहिल्यांदा केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (25 डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पूंछ सेक्टरमधून सीमारेषेपलीकडे गेले. येथून भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केला व त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या तीन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. हे सैनिक 59 बलूच रेजिमेंटचे असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यात पाकिस्तानचे आणखी पाच जवानही जखमी झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कारनं केलेले हे पहिलंच क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन आहे.
कुरापती पाकिस्तानशनिवारी (23 डिसेंबर) कुरापती पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात भारतीय लष्करातील 120 इन्फंट्री ब्रिगेडमधील तीन जवानांसहीत एक अधिकारी शहीद झाले होते. महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले. मोहरकर हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील होते. त्यांचे वय 32 वर्ष एवढे होते. मेजर मोहरकर यांच्यासह जवान कुलदीप सिंग, जवान परगत सिंग आणि जवान कुलदीप सिंग शहीद झाले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली. केरी सेक्टर परिसरात ही चकमक सुरू होती.
पाकिस्तानच्या गोळीबारात 7 स्थानिक जखमीयापूर्वी 18 ऑक्टोबरला पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्काराच्या चौक्यांना पाकिस्ताननं निशाणा साधत हल्ला केला होता. पाकिस्तानच्या या गोळीबारात 7 स्थानिक जखमी झाले होते. पूंछच्या बालाकोटमधील 4 स्थानिक नागरिकही जखमी झाले होते. तर दुसरीकडे 2 ऑक्टोबरला पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात जम्मूतील पूंछ सेक्टर परिसरातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका 10 वर्षीय मुलाचाही समावेश होता. तर 5 जण जखमी झाले होते.
वर्षभरात 900 वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघनशस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानने वर्षभरात 900 वेळा जम्मू-कश्मीरमध्ये गोळीबार केला आहे. पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन 780 वेळा नियंत्रण रेषेपलिकडून तर 120 वेळा आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडून जम्मू-कश्मीरमध्ये गोळीबार केला, अशी माहिती भारतीय लष्कारानं दिली आहे.