ऑनलाइन लोकमत
कानसास, दि. २६ - अमेरिकेत कानसासमधील हेसस्टॉन येथील एका कारखान्यात गुरुवारी एका बंदुकधा-याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जण ठार झाले तर, २० जण जखमी झाले. सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत हा हल्लेखोर ठार झाला अशी माहिती येथील लोकल शेरीफने पत्रकारांना दिली.
हल्लेखोराची ओळख पटली असून, त्याचे नाव सेड्रीस फोर्ड आहे. तो ३८ वर्षांचा होता. गोळीबार करणारा हल्लेखोर एक्सेल कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. एक्सेल इंडस्ट्रीच्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी त्याने तीन ठिकाणी गोळीबार केला अशी माहिती हार्वे काऊंटीचे शेरीफ टी. वॉलटॉन यांनी दिली.
या हल्लेखोराने सर्वप्रथम न्यूटॉनमध्ये एका ट्रक चालकावर गोळीबार केला. त्यानंतर दुस-या रस्त्यावर एका इसमाच्या पयावर गोळी झाडली. एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये प्रवेश केल्यानंतर या हल्लेखाराने अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात चार जण ठार तर, २० जण जखमी झाले.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला. आठवडयाभरात अमेरिकेत झालेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.
मिशिगनमध्ये एका टॅक्सीचालकाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहाजण ठार झाले होते. अमेरिकेत खुलेआम अशा गोळीबाराच्या घटना वाढत चालल्यामुळे सहजरित्या मिळणा-या बंदुकीच्या परवान्यावर निर्बंध यावेत अशी मागणी जोर धरु लागली आहे.