बँकॉक: कोरोनाग्रस्त व्यक्ती संपर्कात आल्यास वेगानं संसर्ग होतो. मात्र आता कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या माध्यमातूनही कोरोना पसरत असल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. थायलंडमधल्या वैद्यकीय निरीक्षकाच्या मृत्यूनंतर शास्त्रज्ञांनी हा संशय व्यक्त केला. फॉरेन्सिक विभागात काम करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून अशा प्रकारची ही पहिलीच घटना समजली जात आहे.फॉरेन्सिक विभागातल्या कर्मचाऱ्यांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचना संशोधकांनी फॉरेन्सिक अँड लिगल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या पत्रात केली होती. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना पसरतो का, हे अद्याप सिद्ध झालं नसल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा मृतदेह हाताळणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याविषयी फॉरेन्सिक अँड लिगल मेडिसिन जर्नलमध्ये २० मार्चला एक पत्र प्रसिद्ध झालं. त्यावेळी थायलंडमध्ये आढळलेले बहुतांश कोरोना रुग्ण परदेशांतून आलेले होते आणि सामुदायिक संसर्गाची लक्षणं अतिशय कमी होती, असं संशोधकांनी पत्रात नमूद केलं होतं. याशिवाय त्यावेळी कोरोनाची बाधा झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या केवळ दोन इतकी होती. त्यामुळेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं वैद्यकीय निरीक्षकांना संसर्ग होण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचं संशोधकांनी म्हटलं होतं.
CoronaVirus: मृत पावलेल्या व्यक्तीमधूनही कोरोनाचा फैलाव?; जगातील पहिलीच घटना असण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 9:00 AM