कटेनिया (इटली):इटलीध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कॅटानिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या वर्षाच्या सुरुवातीला स्पेनला गेल्यानंतर या माणसाला तिन्ही आजार झाले. त्याने अनेक पुरुषांशी असुरक्षित संबंध बनवले होते, त्यामुळेच हे झाल्याची माहिती आहे.
द सनच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती 16 ते 20 जून दरम्यान स्पेनमध्ये राहत होता. जर्नल ऑफ इन्फेक्शनच्या केस रिपोर्टनुसार, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यासारख्या लक्षणांनंतर 2 जुलै रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच दिवशी रुग्णाच्या डाव्या हातावर, चेहऱ्यावर, पायांवर लहान आणि वेदनादायक पुरळ उठू लागले.
यानंतर, 5 जुलै रोजी त्यांला सॅन मार्को युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले, जिथे त्याची मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली. निकाल पॉझिटिव्ह आल्यावर लैंगिक आजारांशी संबंधित चाचण्याही करण्यात आल्या. यात त्याला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस-1 (HIV-1) ची लागण झाल्याचेही आढळून आले. त्याला अलीकडेच एचआयव्ही संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मंकीपॉक्सपासून सुटका झाली11 जुलैपर्यंत रुग्णाच्या शरीरावर उगवलेला मंकीपॉक्स पुरळ सुकून गेला आणि त्याचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि काही दिवस इतरांपासून वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संशोधकांनी सांगितले की, कोरोना आणि मंकीपॉक्सची लक्षणे ओव्हरलॅप होऊ शकतात. तसेच, मंकीपॉक्स झाल्यानंतर 20 दिवसांनंतरही रुग्ण पॉझिटिव्ह येऊ शकतो, त्यामुळे उपचार संपल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे.
जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजारांवर Monkeypoxmeter.com च्या आकडेवारीनुसार, जगात मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 48 हजार 54 वर पोहोचली आहे. हा आजार आतापर्यंत 102 देशांमध्ये पसरला आहे. ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि ब्राझील हे टॉप 10 बाधित देशांमध्ये आहेत. भारतात मंकीपॉक्सची 10 प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे.