बुलडाणा : जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यासाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. यासाठी १३ जुलैपासून उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार पहिल्या दिवशी १३ जुलै रोजी सायंकाळपर्यंत खामगाव तालुक्यात सतरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, तर इतर तालुक्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मिळाली.जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ५२१ ग्रामपंचायती व २५ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुक प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून १३ ते २0 जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंंत उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची तारीख आहे; मात्र आज पहिल्या दिवशी निवडणूक विभागाच्या कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. काही मोजक्या निवडणूक इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची मागणी केली. २0 जुलै ही उमेदवारी अर्ज मागविण्याची व सादर करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे येणार्या दिवसात गर्दी वाढणार आहे. शिवाय २१ जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छानणी होईल तर २३ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २३ जुलै रोजीच चिन्हाचे वाटप व निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध होईल. ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. ६ ऑगस्ट रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी १७ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: July 14, 2015 2:11 AM