संयुक्त राष्ट्रे : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जगभरात ३ लाख ९५ हजार मुलांचा जन्म झाला. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७० हजार बालके भारतात जन्मली. युनायटेड नॅशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) ही माहिती दिली आहे.जगभरात यावर्षीच्या पहिल्या दिवशी ३ लाख ९५ हजार ७२ बालकांचा जन्म झाला. यातील अर्ध्यापेक्षा अधिक बालके भारत, चीन, पाकिस्तान, अमेरिका आणि बांगलादेशसह आठ देशांतील आहेत. भारतात जन्मलेल्या बालकांची संख्या ६९ हजार ९४४ एवढी आहे. त्यानंतर चीनचा क्रमांक आहे. त्या देशात ४४ हजार ९४०, नायजेरियात २५ हजार ६८५, पाकिस्तानात १५ हजार ११२ बालकांचा जन्म झाला.इंडोनेशियात १३ हजार २५६, अमेरिकेत ११ हजार ०८६, कांगोमध्ये १० हजार ०५३ बालकांचा आणि बांगलादेशात ८ हजार ४२८ बालकांचा जन्म झाला.नव्या वर्षात सर्वात प्रथम फिजीमध्ये बालकाचा जन्म झाला, तर सर्वात शेवटी अमेरिकेतील बालक जन्माला आले. प्रत्येक नवजात बालक आरोग्यदायी राहील अशी काळजी घ्यावी, असे आवाहन युनिसेफने सर्व राष्ट्रांना केले आहे.नव्या वर्षाच्या सुरुवातीला रात्री १२ नंतर सिडनीत १६८, टोक्योत ३१०, बीजिंगमध्ये ६०५, माद्रिदमध्ये १६६ आणि न्यूयॉर्कमध्ये ३१७ बालकांचा जन्म झाला. (वृत्तसंस्था)मृत्यूदरही अधिकयुनिसेफच्या कार्यकारी उपसंचालक चार्लोट पेट्री गोर्निटजका यांनी सर्व राष्ट्रांना आवाहन केले आहे की, प्रत्येक बालकाच्या जीवित राहण्याच्या अधिकाराचे पालन होईल, याची काळजी घेतलीजावी.सुरुवातीच्या काही महिन्यांत बालकांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करताना म्हटले आहे की, २०१७ च्या आकडेवारीनुसार, जगात १० लाख बालकांचा जन्मत:च मृत्यू झाला. तर, २५ लाख बालकांचा जन्मल्यानंतर पहिल्या महिन्यातच मृत्यू झाला.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी जगात ३ लाख ९५ हजार बालकांचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 6:03 AM