कोरोनाची लागण झालेल्या जगातल्या पहिल्या कुत्र्याचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे क्वॉरेंटाईनमधून घरी सोडण्यात आल्यानंतर या कुत्र्यानं प्राण सोडला. कुत्रा ठणठणीत बरा झाल्याचं डॉक्टरांनी त्याला क्वॉरेंटाईनमधून घरी सोडलं होतं. मात्र त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत कुत्रा दगावल्यानं कुत्र्याच्या मालकिणीला धक्का बसला. हाँगकाँमध्ये ही घटना घडलीय. हाँगकाँगमध्ये १७ वर्षीय पॉमेरियन कुत्र्याचा मृत्यू झालाय. कुत्र्याची ६० वर्षीय मालकीण इवॉन चॉ हाऊ ली यांना गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झाली. त्यांच्याकडून कुत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र त्या आठवड्याभरात बऱ्या झाल्या. हाऊ ली यांच्या माध्यमातूनच कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती हाँगकाँगच्या कृषी, मत्स्योत्पादन विभागाच्या प्रवक्त्यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिली. १६ मार्चला कुत्रा मरण पावल्याचं हाऊ ली यांनी सांगितलं. कुत्र्याच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी ऑटोप्सी करणं आवश्यक आहे. मात्र हाऊ ली त्यासाठी परवानगी देत नसल्याचंदेखील प्रवक्त्यानं पुढे सांगितलं.पॉमेरियन कुत्र्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. १२ आणि १३ मार्चला त्याची तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं त्याला घरी सोडण्यात आलं. मात्र त्यानंतर तीनच दिवसांत त्याचा मृत्यू झाला. या कुत्र्याच्या मालकिणीला फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोना झाला होता. त्यानंतर त्या रुग्णालयात दाखल झाल्या. ८ मार्चला त्या ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या. सध्या तरी कुत्रा या एकमेव प्राण्याला कोरोनाची बाधा झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून कोरोना पसरत असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याचंदेखील संघटनेनं म्हटलं होतं. कोरोना झालेल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानं आता जगभरातल्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Coronavirus: कोरोनाचा संसर्ग झालेल्या जगातील पहिल्या कुत्र्याचा मृत्यू; तीन दिवसांपूर्वीच मिळाला होता डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 2:12 PM
Coronavirus मालकिणीच्या संपर्कात आल्यानं कोरोना झालेल्या कुत्र्याचा मृत्यू
ठळक मुद्देतीन दिवसांपूर्वी कुत्र्याला मिळाला होता डिस्चार्जक्वॉरेंटाईनमधून सोडण्यात आल्यानंतर कुत्र्याचा मृत्यूमालकिणीच्या माध्यमातून झाली होती कोरोनाची लागण