ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ऐतिहासिक क्युबा दौ-या दरम्यान एका डिनर कार्यक्रमाला अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी काश्मिरी गाऊन परिधान केला होता. फुलांची डिझाईन असलेल्या या गाऊनवर भारतीय-अमेरिकन डिझायनर नईम खानने नक्षीकाम केले होते.
काश्मिरी कपडयापासून बनवलेला हा गाऊन मिशेल यांनी खास निवडला असे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. काश्मिरचे पारंपारिक 'आरी काम'ची डिझाईन या गाऊनवर होती. भारतातून आल्यानंतर अमेरिकेने माझ्यासाठी जे केले त्याचीच परतफेड मी केलीय असे नईम खानने सांगितले.
मिशेल ओबामांमुळे माझ्या कलेक्शनचे ब्राण्ड नेम झाले. मी त्यांच्यासाठी काहीही करु शकतो असे नईम खान यांनी सांगितले. १९२८ नंतर सपत्नीक क्युबा दौ-यावर आलेले बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहेत.