रशियानेयुद्धाच्या भयंकर खाईत लोटलेल्या युक्रेनच्या प्रथम महिला म्हणजेच राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना जेलेन्स्की यांनी जगाला उद्देशून पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर निर्दोष नागरिकांच्या नरसंहाराचा आरोप लावला आहे.
ओलेना यांनी या खुल्या पत्राला 'युक्रेनकडून साक्ष' (testimony from Ukraine) नाव दिले आहे. युक्रेनचे लोक कधीही हार मानणार नाहीत. शस्त्रे खाली ठेवणार नाहीत, आमच्या देशासोबत जे काही झाले आहे, त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे पत्र त्यांनी जगभरातील प्रसारमाध्यमांना लिहिले आहे. टेलिग्रामवर हे पत्र जारी करण्यात आले आहे.
क्रेमलिन-आधारित प्रोपगंडा इन्स्टिट्यूटने आश्वासन देऊनही युक्रेनियन नागरिकांची हत्या करण्यात आली, जे याला 'विशेष ऑपरेशन' म्हणत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या लोकांना कमी लेखले आहे. युक्रेनचे नागरीक अतुलनीय एकता दाखवत आहेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याचबरोबर युद्धात झालेल्या मुलांच्या मृत्यूची निंदा करताना ओलेना यांनी मरण पावलेल्या काहींची नावे लिहिली. त्यांनी लिहिले की अशी डझनभर मुले आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही शांतता पाहिली नाही. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची पत्नी सध्या कुठे आहे, हे अद्याप समजलेले नाही. गेल्या आठवड्यात त्या युक्रेनमध्येच असल्याचे वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले होते.
मुलांचा झालेला मृत्यू हा रशियन आक्रमणाचा सर्वात भयंकर आणि विनाशकारी परिणाम आहे. आठ वर्षांची अॅलिस ऑक्टीर्का तिच्या आजोबांच्या समोर रस्त्यावर मरण पावली. कीवची पोलिना तिच्या आई-वडिलांसह मारली गेली. 14 वर्षीय आर्सेनीच्या डोक्यावर स्लॅब पडला. रुग्णवाहिका वेळेत पोहोचू न शकल्याने त्याला वाचवता आले नाही. या मुलांची हत्या झाली आहे, असे ओलेना यांनी म्हटले आहे.