ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 31 - पाकिस्तानमधील अल्पसंख्याक अहमदिया समुदायाशी निगडीत असलेले आणि पाकिस्तानच्या पहिले नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी घटना घडली आहे.
जमात-ए-अहमदियाचे नेते अॅड. मलिक सलीम लतीफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड.मलिक सलीम लतीफ आणि त्यांचा मुलगा अॅड. फरहान यांच्यावर कोर्टात जात असताना गोळीबार करण्यात आला. ज्यात लतीफ यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.
पंजाब प्रांतातील लाहोरजवळील त्यांच्या घरापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. अहमदिया समुदायाचे प्रवक्ते सलीमुद्दीन यांनी लतीफ यांच्या हत्येची माहितीला दुजोरा दिला आहे. सलीम हे पाकिस्तानी नोबेल पुरस्कार विजेता शास्त्रज्ञ अब्दुस सलाम यांचे चुलत भाऊ. 1979 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
लष्कर-ए-झांगवीने स्वीकारली जबाबदारी
या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना लष्कर-ए-झांगवीने स्वीकारली आहे. अहमदिया समुदायाच्या लोकांना धमकी मिळणे ही सामान्य बाब आहे. लतीफ हे अहमदिया समुदायाला मान्यता मिळण्यासाठी झटत होते. तसेच ते अहमदिया समुदायाचे मोठे नेते आणि प्रसिद्ध वकील होते, अशी माहिती सलीमुद्दीन यांनी दिली. यापूर्वीही अहमदिया समाजावर सातत्याने हल्ले झाल्याचंही सलीमुद्दीन यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या अहमदिया समुदायाच्या लोकांना स्वत:ला मुस्लिम मानणे आणि इस्लामिक प्रतिकांचा वापर करण्यास मनाई आहे. असे करणाऱ्या लोकांवर ईशनिंदेचा खटला दाखल होतो. गेल्या 30 वर्षांमध्ये अशा 1335 प्रकरणांत 494 लोकांवर खटले दाखल करण्यात आलेत. दरम्यान, सुरक्षा दल या प्रकरणाचा तपास करत हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.